पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी पाच जानेवारी रोजी दुपारी हत्या झाली. या प्रकरणात दोन वकिलांनाही अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही वकील आरोपींसोबत दीड तास होते. त्यांनी एकत्र प्रवास केला, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
पुणे शहरातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा तपासाला वेग आला आहे. हा तपास अधिक वेगाने करण्यासाठी आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे देण्यात येणार आहे. गुन्हे शाखेकडून या प्रकरणाच्या सखोल तपास करण्यात येणार आहे. यावेळी पुणे पोलिसांनी न्यायालयात या खून प्रकरणाची महत्वाची माहिती दिली. या खून प्रकरणात अटक करण्यात आलेले दोन्ही वकील दीड तास आरोपींबरोबर होते. त्यांनी एकत्र प्रवास केला. आरोपींना दोन्ही वकील खेड शिवापूर टोलनाक्यावर जाऊन भेटले. वकिलांचा आरोपी शरण येण्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात खोडला. आरोपींना पोलिसांकडे शरण यायचे होते, मग त्यांनी सिम कार्ड का बदलेले ? असा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान न्यायालयाने दोन्ही वकिलांनाही ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.