अद्याप तीन ते 4 हजार कॅरेट टोमॅटो शेतातून निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची एकूण कमाई साडेतीन कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.
गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर (Tomato Price) गगनाला भिडलेले आहेत. 150 ते 200 रुपये किलो दराने टोमॅटो विकले जात आहेत. काही महिन्यापूर्वीच दर मिळत नाही म्हणून बांधावर लाल चिखल केला जात होता. अनेक शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. पण काही शेतकऱ्यांनी जिद्द सोडली नाही. पुण्यातील जुन्नर येथील एका शेतकऱ्याने टोमॅटोमधून तब्बल 2.8 कोटी रुपये कमावले आहेत. पण त्यासाठी त्याला सात ते आठ वर्ष वाट पाहावी लागली. कधी नुकसानही सहन करावे लागले. 2021 मध्ये टोमॅटोचे दर घसरल्यामुळे त्याला 20 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. पण त्याने जिद्द सोडली नाही. यंदा त्याने 12 एकरमध्ये टोमॅटोचीच लागवड केली होती. या टोमॅटोने त्याला फक्त 25 दिवसांमध्ये करोडपती केले. जुन्नरमधील ईश्वर गायकर असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. मागील सात ते आठ वर्षांपासून 12 एकरात टोमॅटोची लागवड करतात. कधीकधी फक्त मुद्दलच मिळाली तर कधी नुकसान सहन करावे लागले. पण यंदा ते करोडपती झाले. त्यांच्याकडे अद्याप 4 हजार कॅरेट्स टोमॅटो शिल्लक आहेत, त्यामुळे एकूण कमाई 3.5 कोटी रुपये होईल, अशी गायकर यांना आपेक्षा आहे.
गायकर म्हणाले की, ‘मी आतापर्यंत 17 हजार कॅरेट टोमॅटो विकले आहेत. प्रत्येक कॅरेटची किंमत 770 ते 2311 रुपये इतकी मिळाली. शेतामध्ये अद्याप तीन ते 4 हजार कॅरेट टोमॅटो असतील. यामुळे टोमॅटोमधून एकूण 3.5 कोटी रुपयांपर्यंत कमाई होईल. या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. आई-वडील आणि बायकोच्या अपार कष्टामुळेच आज इतके यश मिळालेय. ‘
यंदा टोमॅटोला 30 रुपये किलो भाव येईल, असा अंदाज होता. पण आम्हाला बंपर लॉटरी लागली. 150 ते 200 रुपये किलो दराने टोमॅटो विकले गेले, असेही गायकर म्हणाले. दरम्यान, दीड महिन्यांपूर्वी ज्या टोमॅटोचा चिखल झाला. आज तोच टोमॅटो भाव खातोय. टोमॅटो हब म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पुण्याच्या जुन्नरमधील गायकर कुटुंबाला तर याच टोमॅटोनं करोडपती बनवलंय. गायकरांनी बारा एकरात टोमॅटोची लागवड केलीये. उन्हाळी हंगामासाठी त्यांनी पस्तीस लाख रुपये खर्ची घातले. तेव्हा कुठं जाऊन एक रुपयाच्या बदल्यात दोन रुपयांचा त्यांना फायदा झाला. मात्र गेल्या तीन वर्षांत याच टोमॅटोचा डोळ्यादेखत लाल चिखल झाल्यानं, मोठा तोटा झाला.
गायकर कुटुंब 2005 पासून शेती करत आहे. आधी वडिलांनी शेतात जिवाचं रान केले होते. आता ईश्वर गायकर काबाड कष्ट करत आहेत. 2017 मध्ये गायकर यांनी टोमॅटो लागवड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी एक एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली होती. त्यानंतर पुढच्यावर्षीपासून 12 एकरमध्ये टोमॅटो लागवड सुरु केली. 2021 मध्ये त्यांना जवळपास 20 लाख रुपयांचं नुकसान सहन करावे लागले. पण गायकर कुटुंबाने जिद्द सोडली नाही. त्यांनी पुन्हा टोमॅटोचीच लागवड केली. यंदा त्यांना बंपर लॉटरी लागली. आतापर्यंत दोन कोटी 80 लाख रुपयांची कमाई झाली आहे. अद्याप तीन ते 4 हजार कॅरेट टोमॅटो शेतातून निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची एकूण कमाई साडेतीन कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.