पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी मनसेच्या दोन नेत्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. कायम चर्चेत राहणारे मनसे नेते वसंत मोरे यांनी ठेवलेले स्टेटस चर्चेचा विषय ठरला होता. यावर मोरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीआधी सर्व पक्ष तयारीला लागल्याचं दिसत आहे. भाजपने आपण 40 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचं सांगितलं आहे. तर महाविकास आघाडी ताकद लावत असल्याचं दिसत आहे. पुण्यातील लोकसभा जागेवरून मनसेनमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मनसे नेते आणि नगरसेवक वसंत मोरे यांच्या व्हाट्सअॅप स्टेटसची जोरदार चर्चा झालेली पाहायला मिळाली. वसंत मोरे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले वसंत मोरे?
पक्षात ताकदीची लोक असताना काही लोक एनजीओच्या लोकांना पण संधी मिळू शकते अस बोलतात. मला राज ठाकरे संधी देतील. स्टेटस कोणाला लागायचं त्याला लागलं. मी भावी नाही तर खासदारच होणार आहे. गेली 15 वर्षे मी पुण्याचा नगरसेवक असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांच्या वक्तव्यावरही वसंत मोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शर्मिला ठाकरे पुण्यात साईनाथ बाबर यांच्या कार्यक्रमाला आल्या होत्या. तेव्हा साईनाथ दिल्लीला गेला तर दुधात साखर पडेल असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या. यावर बोलताना, शर्मिला वहिनी या शिरूर लोकसभेबद्दल बोलल्या असाव्या. कारण साईनाथ बाबर यांचा प्रभाग हा शिरूर मध्ये येत असल्यातं वसंत मोरे म्हणाले.
अब की बार मोदी सरकार होऊ शकतं तर पुणे की पसंत मोर वसंत का नाही होऊ शकत. गेल्या 15 वर्षांपासून मी निवडून येणारा एकमेव नगरसेवक आहे. पुणे शहरात माझं काम आहे त्यामुळे लोकांच्या मनामध्ये वसंत मोरे आहे. पुणेकर माझ्या कामाला लाईक करत असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पाडली. या बैठकीला वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी उपस्थिती लावली होती. राज ठाकरे येत्या 10, 11 आणि 12 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर असणार आहेत. या बैठकीमध्ये सर्वांचं लक्ष लागलं आहे.