Explore

Search

Monday, December 23, 2024, 8:03 pm

Monday, December 23, 2024, 8:03 pm

Latest News

सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस? महत्त्वाची माहिती समोर

Share This Post

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, प्रशासनाकडून शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. राज्यातील तीन-चार जिल्हे वगळता सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, कोल्हापूर, सातारा, नांदेड, पुणे या जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. अनेक भागांमध्ये नद्यांना पूर आलाय, घरं पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या देखील घटना घडल्या आहेत. रायगडच्या इर्शाळवाडी गावावर डोंगराचा भला मोठा कडा पडला. त्यामुळे संपूर्ण गाव चिरडलं गेलं. राज्यभरात धुमाकूळ घालणारा हा पाऊस आता किती दिवस मुक्काम करणार? असा प्रश्न अनेकांना पडलाय. हवामान विभागाकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून महाराष्ट्रासाठी पुढच्या पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलं आहे. राज्यासाठी आता रेड अलर्ट टळला आहे. याशिवाय महाराष्ट्रात पुढच्या पाच दिवसांमध्ये पाऊस कमी होणार आहे. महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीची स्थिती नाही. पावसाचा जोर कमी होत जाणार, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

कोकणसाठी ऑरेंज अलर्ट
कोकणातील जिल्ह्यांना पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट असणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही आता अतिवृष्टी होणार नाही. हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पावसाचा जोर उद्यापासून आणखी कमी होईल. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ सर्व ठिकाणी आता वातावरण नॉर्मल आहे. तरीही आजसाठी कोकण, ठाणे, रायगड, पालघर, रत्निगिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पण पुढच्या पाच दिवसांत कुठेही अतिवृष्टीची शक्यता नाही, असं डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितलं.

चंद्रपुरात पावसाचा हाहा:कार
चंद्रपुरात शहरात पावसाचा मोठा फटका बघायला मिळाला. शहरातील घरांमध्ये सात ते आठ फुटांपर्यंत पाणी आलं. नागरीक स्वत:ला वाचवण्यासाठी घराच्या छतावर गेले. घटनेचं गांभीर्य लक्षात एनडीआरएफची टीम शहरात मदतीला लागली. घरात कुणी आहे का? असा आवाज देत एनडीआरएफच्या जवानांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी नेलं. एनडीआरएफच्या जवानांनी अशापद्धतीने 70 पेक्षा जास्त जणांना सुरक्षितस्थळी हलवलं.

ठाणे जिल्ह्यातही प्रचंड पाऊस
मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही प्रचंड पाऊस पडला. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी या शहरांमध्ये प्रचंड पाऊस पडला. कल्याणमध्ये काल प्रचंड पाऊस पडला. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं होतं.

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन