पुण्यातील एमपीएससी टॉपर दर्शना पवार हिचा मृतदेह आठ दिवसानंतर सापडला आहे. तिच्या शरीरावर आणि जखमा आढळून आल्याने तिची हत्या केल्याचं उघड झालं आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली आहे.
पुणे : PUNE HERALD | तब्बल पाच दिवसानंतर दर्शना पवार या तरुणीचा मृतदेह सापडला आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तिचा मृतदेह आढळून आला आहे. कुजलेल्या अवस्थेत दर्शनाचा मृतदेह आढळल आहे. तिच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळून आल्याने तिची हत्याच झाली असल्याचा पोलिसांना संशय असून त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दर्शना मित्रांसोबत ट्रेकिंगला गेली होती. मात्र, तेव्हापासून तिचे मित्रही गायब झाले आहेत. आता या मित्रांना शोधून त्यांच्याकडून त्या दिवशी नेमकं काय झालं याची माहिती घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.
दर्शना पवार हिला वनखात्यात आरएफओ अधिकारी व्हायचं होतं. त्यासाठी तिने एमपीएससीची परीक्षा दिली होती आणि त्यात ती उत्तीर्णही झाली होती. परीक्षा पास झाल्यामुळे ती तिच्या कोंचिग क्लासमध्येही समारंभासाठी आली होती. त्यानंतर 12 जून रोजी ती तिचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे यांच्यासोबत ट्रेकिंगला गेली होती. राजगड किल्ल्यावर तिच्यासोबत इतरही काही मित्र ट्रेकिंगसाठी आले होते. ट्रेकिंगला गेल्यानंतर तीन दिवस झाले तरी ती परत आलीच नव्हती. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी अखेर 15 जून रोजी नऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोस्टमार्टममधून धक्कादायक खुलासा
या दरम्यान, दर्शनाच्या कुटुंबीयांनी तिच्या सर्व मित्रांकडे फोन करून तिच्याबाबत विचारणा केली. तसेच काही मित्रांच्या घरी जाऊनही विचारपूस केली. नातेवाईकांकडेही दर्शना आली का म्हणून विचारणा केली. पण तिचा कुठेच पत्ता लागला नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी अखेर दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात केली.
त्यानंतर पोलिसांनी दर्शनाचा शोध घेतला असता तिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी सडलेल्या अवस्थेत आढळला. तिच्या अंगावर गंभीर जखमा होत्या. तसेच डोक्याला मार होता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे दर्शनाचा खून झाल्याचं उघड झालं आहे.
त्या चौकशीतून सत्य
9 जून रोजी पुण्यातील स्पॉट लाईट अकादमीत दर्शनाचा सत्कार करण्यात आलेल होता. एमपीएससी परीक्षेत ती राज्यात सहावी आल्यामुळे हा सत्कार समारंभ झाला होता. त्यानंतर 12 जून रोजी ती ट्रेकिंगला गेली. तेव्हापर्यंत ती कुटुंबाच्या संपर्कात होती. मात्र, नंतर तिचा संपर्क होत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी अकादमीत जाऊन चौकशी केली.
त्यावेळी दर्शना तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यासोबत सिंहगड आणि राजगडमध्ये फिरायला गेल्याचं कळलं. तिथे हे ट्रेकिंग करणार असल्याचंही समजलं. पण दर्शना आणि राहुलचाही संपर्क होत नसल्याने अखेर पोलिसात तक्रार दिल्याचं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं. दरम्यान, राहुल हा गायब असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राहुल सापडल्यानंतरच या प्रकरणातील सत्य समोर येईल, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
सीसीटीव्हीत दडलंय काय?
दरम्यान, पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दर्शना तिच्या मित्रासह दुचाकीवरून राजगडला जाताना दिसत आहेत. तर राहुल हा एकटाच पुण्याच्या दिशेने परतताना दिसत आहे. या सीसीटीव्हीतून आणखीही बरीच माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचं सांगितलं जात आहे. पण पोलिसांनी त्याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे सीसीटीव्हीत दडलंय काय? असा सवाल केला जात आहे. या घटनेत सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्त्वाचा पुरावा असल्याचंही सांगितलं जात आहे.