सेंटोसा वॉटरपार्कमध्ये सहा वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू; मॅनेजर, सुपर वायझरवर गुन्हा दाखल
मयत मुलगी ही सेंटोसा पार्क येथे तिची आई व दोन भावांसह पिकनिकला आली होती…
पिंपरी : PUNE HERALD | सहा वर्षीय मुलीचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. रावेत येथील सेंटोसा वॉटर पार्क येथे सोमवारी (दि. १२) ही घटना घडली. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात सेंटोसा वॉटर पार्कच्या मॅनेजर व सुपर वायझरवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मॅनेजर अजय हरीलाल हिंदुजा (रा. पिंपळे सौदागर) व सुपरवायझर राहुल आबा मोरे (रा. रावेत) यांच्या विरोधात पोलिसांनी बुधवारी (दि. १४) गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार राकेश शांताराम पालांडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलगी ही सेंटोसा पार्क येथे तिची आई व दोन भावांसह पिकनिकला आली होती. यावेळी तेथे कोणताही सुरक्षा रक्षक नसताना, कोणतेही सुरक्षा भिंत, लाईफ जॅकेट अशी कोणतीच सुविधा नसल्याने मयत मुलगी थेट जलतरण तलावाच्या पाण्यात बुडाली. यात तिचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे. वॉटर पार्कच्या यंत्रणेवर गुन्हा दाखल केला असून रावेत पोलीस तपास करत आहेत.