Explore

Search

Tuesday, December 24, 2024, 10:06 pm

Tuesday, December 24, 2024, 10:06 pm

Latest News

MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरण, मित्र राहुल हंडोरेला मुंबईत अटक, खुनाचे धक्कादायक कारण समोर

Share This Post

 

पुणे : PUNE HERALD | एमपीएससी टॉपर दर्शना पवार हिच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र राहुल हंडोरेला अखेर अटक केली आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी चार दिवसांपूर्वी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरत असलेल्या राहुलला अखेर मुंबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी शिताफीने राहुलला ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. दर्शनाची हत्या केल्याची कबुली राहुलने दिल्याची माहिती आहे. तिचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवातून स्पष्ट झाले होते.

 

दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे एकमेकांचे दूरचे नातेवाईक आहेत. गेली अनेक वर्ष ते एकमेकांना ओळखतात. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. परंतु नात्यात असल्यामुळे पवार कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. घरच्यांनी तिचं इतरत्र लग्न ठरवलं होतं. दर्शनाने नुकतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण केली. तर दुसरीकडे राहुल मात्र परीक्षेत अपयशी झाला होता. त्यातच लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याच्या रागातूनच राहुलने दर्शनाची हत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. आज दुपारी पुण्याचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल पत्रकार परिषद घेऊन याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत.

 

काय आहे प्रकरण?

 

दर्शना राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवडही झाली होती. पुण्यातील एका संस्थेकडून तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. नऊ जून रोजी ती पुण्यात आली होती. नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे ती राहत होती. १२ जून रोजी सिंहगडावर जायचे आहे, असं मैत्रिणीला सांगून ती घराबाहेर पडली.

 

दर्शनाने कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली होती. तिच्यासोबत मित्र राहुल हंडोरे होता. १२ जूनला तिच्या कुटुंबीयांनी संपर्क साधल्यावर तिचा मोबाइल बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी शोध सुरू केला. मात्र, तिचा ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीय चिंतेत होते. दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी सिंहगड रस्ता पोलिसांत दिली.

 

दुसरीकडे, राहुल हंडोरे बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनीही तो बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे पोलिस ठाण्यात दिली. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सतीचा माळ परिसरात रविवारी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. दर्शना आणि राहुल १२ जून रोजी दुचाकीवरून वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ला परिसरात गेले.

 

सकाळी सव्वासहाच्या सुमारास दोघे जण गडाच्या पायथ्याशी पोहोचले. दोघांनी गड चढायला सुरुवात केली. सकाळी दहाच्या सुमारस राहुल गडावरून एकटाच खाली आला. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणातून ही माहिती उपलब्ध झाली आहे.

 

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन