येत्या 22 जानेवारी रोजी राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा आहे. बाकीच्या भानगडीत जाऊ नका. मलाही त्यात पडायचं नाही. पण राम मंदिर होणं याही पेक्षा मला सर्वात महत्त्वाचं वाटतं, ते म्हणजे कारसेवकांनी जे कष्ट घेतले, त्यांचं स्वप्न पूर्ण होतंय. त्यामुळे त्या दिवशी पूजा आरत्या करा. तुम्हाला जिथे जिथे काय करता येईल ते करा. हे करताना कुणाला त्रास होणार नाही, याची काळजी घ्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजारी आहेत. त्यांना ताप आला असून अशक्तपणा जाणवत आहे. स्वत: राज ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे. मला कार्यक्रमाला यायला उशीर झाला. मी येऊच शकत नव्हतो. काल संध्याकाळपासून ताप आल्यासारखं वाटत होतं. आता मी सकाळी उठल्यावर डोळे उघडत नव्हते. अशक्तपणा आहे. पण तुम्ही इतक्या लांबून आला आहात. तुमचं दर्शन घेतल्याशिवाय मी परतणार नाही. म्हणून कार्यक्रमाला आलो आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
मनसेने ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी तब्येतीची माहिती दिली. निधी कसा आणायचा? कोणत्या योजना राबवायच्या? काम कसं करायचं? हे तुम्हाला माहीत नसेल असं नाही. तुमच्या भागातील प्रश्न तुम्हाला माहीत आहेत. त्यामुळे ते कसं सोडवायचे हे माहीत आहे. आज ग्रामपंचायती. उद्या जिल्हा परिषदांवर जाल. नंतर आमदार, खासदार व्हाल. पण लगेच आताच स्वप्न पाहू नका. तुम्ही तुमच्या भागात योजना आणाल आणि प्रगती कराल याची कल्पना आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
जगण्याचं वातावरणच नाही
यावेळी त्यांनी स्वच्छतेचा कानमंत्र दिला. तसेच आपल्या सभोवतालचं वातावरण चांगलं ठेवण्याच्याही सूचना केल्या. आपल्याकडे शिक्षण आणि नोकऱ्या मिळत नाही का? ग्रामीण भागातील मुलं शहरात यायला बघत आहेत. शहरातील मुलं हे परदेशात जाऊ इच्छित आहेत. म्हणजे काय चाललंय? आपली पोरं परदेशात का जात आहेत? शिक्षण आणि नोकऱ्या नाही म्हणून का? तर तसं नाही. ते बाहेर जात आहेत, कारण सभोवतालचं वातवरण नाही.