सध्या घराघरात टोमॅटोची चर्चा सुरु आहे. कारण सध्या टोमॅटोचे दर वाढले आहेत. या प्रकरणी अभिनेता सुनील शेट्टी अडचणीत आला होता. आता शेतकऱ्याच्या टोमॅटोची चोरी झालीय. त्याची रितसर तक्रार दाखल झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी कांदा आणि टोमॅटो लागवड कारण म्हणजे मोठी जोखीमचे काम असते. कारण या पिकांच्या मालाबाबत नेहमी अनिश्चितता असते. या पिकाचा लागवड खर्च तर दूर बऱ्याच वेळा काढणीचा खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती असते. यामुळे बाजार समितीत हा माल नेण्यापेक्षा शेतकऱ्यांवर रस्त्यावर कांदा, टोमॅटो फेकण्याची वेळ अनेक वेळा आली आहे. परंतु यंदा कधी नव्हे तो टोमॅटोने भाव खाल्ला. शेतकऱ्यांना चार पैसे या पिकातून मिळाले. मग काय चोरींची नजर या पिकावर गेली. पुणे जिल्ह्यात ४०० किलो टोमॅटोची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
नेमका काय आहे प्रकार
शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावातील शेतकरी अरुण बाळू ढोमे यांनी दोन एकर शेतात टोमॅटोची लागवड केली. सोमवारी १७ जुलै रोजी बाजारात विक्रीसाठी त्यांनी टोमॅटो तोडून ठेवले. सकाळी बाजार समितीत जाऊन टोमॅटोच्या विक्रीसाठी त्यांनी ४०० किलो टोमॅटो ट्रकमध्येच ठेवले. २० कॅरेटमध्ये हा माल होता. झोपण्यापूर्वी त्यांनी गाडीत टोमॅटो असल्याची पुन्हा खात्री करुन घेतली. मग मंगळवारी टोमॅटो बाजारात नेण्यासाठी ते उठले असता गाडीत टोमॅटो नव्हते. त्यांनी आणि कुटुंबियांनी सर्वत्र २० कॅरेट टोमॅटोचा शोध घेतला. परंतु कोठेही टोमॅटो नव्हते.
पोलिसांत नोंदवला गुन्हा
ढोमे कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेऊन टोमॅटो मिळून आले नाही. त्यानंतर त्यांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन २० हजार रुपये किंमतीचे ४०० किलो टोमॅटो चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता शिरुर पोलिसांना त्या टोमॅटो चोराचा शोध घ्यावा लागणार आहे. परंतु टोमॅटोची चोरी हा परिसरात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.