राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी रविवारी बंड पुकारले. त्यानंतर ते शिवसेना अन् भारतीय जनता पक्षासोबत आले. आता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार? यावरुन चर्चा सुरु आहे.
पुणे : PUNE HERALD | राज्यातील राजकारणात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहे. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसपासून अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला. अजित पवार शिवसेना-भाजप युतीसोबत आले. ते उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार अन् या मंत्र्यांचे खातेवाटप अद्याप जाहीर झालेले नाही. त्यातच कोणाला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळणार? या विषयावरसुद्धा चर्चा होत आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांना देण्यास भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे.
चंद्रकांत पाटील की अजित पवार
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सध्या चंद्रकांत पाटील आहेत. परंतु आता अजित पवार सरकारसोबत आल्यामुळे पुण्याचे पालकमंत्री कोण होणार? यावरून भाजप आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरु झाली आहे. भाजपकडून अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रीपद देण्यास विरोध होत आहे. पुणे जिल्ह्यात भाजप आमदार आणि नगरसेवकांची संख्या जास्त असल्यामुळे पालकमंत्री पद भाजपकडे ठेवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे गेल्यास भाजप बॅकफूटवर जाईल, अशी भीती भाजप कार्यकर्त्यांना आहे.
पुणे शहरात राष्ट्रवादीत दोन गट
पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहे. मंगळवारी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत शरद पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु बैठकीला अनेकांची दांडी होती. पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दोन्ही गटाकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर कार्यालयाबाहेर पुणे पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. नाशिकच्या घटनेनंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले आहे. शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. राष्ट्रवादी कार्यालयाचा ताबा कुणी घेऊ नये यासाठी शरद पवार गटाचे कार्यकर्ते अलर्ट झाले आहे.