Sangli Crime: सांगलीमध्ये रविवारी भरदिवसा फिल्मीस्टाईल रिलायन्स ज्वेलर्स शाॅपीवर पडलेल्या दरोड्याने व्यावसायिकांमध्ये थरकाप उडाला आहे. ज्वेलरीवर भरदिवसा दरोडा टाकत तब्बल 14 कोटी दागिन्यांची लूट करुन दरोडेखोर कारमधून फरार झाले. ज्या पद्धतीने सशस्त्र दरोडा टाकण्यात आला ती पद्धत पाहता हे दरोडेखोर अत्यंत सराईत आणि परप्रांतीय असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पथके रवाना केली असली, सोमवारी सकाळपर्यंत कोणतेही धागेदोरे हाती आलेले नाहीत. त्यामुळे या दरोड्याची उकल करण्याचे दिव्य आव्हान सांगली पोलिसांसमोर आहे.
सांगलीमधील रिलायन्स ज्वेलर्सच्या शोरुममध्ये पडलेल्या सशस्त्र दरोडामध्ये एकूण 14 कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे. परराज्यातील ही टोळी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सांगली पोलीस दलासह अन्य पोलीस दलाच्या मदतीने पथके दरोडेखोरांचा शोध सुरु असला, तरी अद्याप पोलिसांच्या हाती काही लागलेलं नाही.
लुटलेली हिऱ्याची बॅग विसरले
लुटीमध्ये हिरेजडित तसेच सोन्याचे दागिने दरोड्यातील लुटीचा आकडा कोट्यवधींच्या घरात गेला आहे. दरोडेखोरांनी लूट केल्यानंत ज्वेलर्समधील हिरे सुद्धा एका बॅगेत भरले होते. मात्र, ज्वेलर्समधून बाहेर पडताना शेवटच्या क्षणी हिऱ्याची बॅग विसरुन गेल्याने कोट्यवधी रुपयांचे हिरे वाचले आहेत.
रेकी करुनच सशस्त्र दरोडा टाकला
सांगली-मिरज रोडवर रिलायन्स ज्वेलर्सचे शोरुम आहे. या रोडवर एक झाड रविवार दुपारी तोडण्यात येत होते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्याचाच फायदा घेत दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकला. यावेळी शोरुममधील सर्व सोने आणि हिरे लुटले. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला तातडीने पाचारण करण्यात आले. परंतु, शोरुमबाहेर श्वान घुटमळले.
दरोडेखोरांनी शोरुमची यापूर्वी पाहणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची खात्री केली होती. त्यामुळे चेहरे न झाकताच त्यांनी दरोडा टाकला. लूट केल्यानंतर कोणताही पुरावा राहू नये म्हणून सीसीटीव्ही डीव्हीआरही कर्मचाऱ्यांना सांगून काढून घेतला. या गडबडीत एक डीव्हीआर खाली पडून फुटल्याने ते तसेच सोडून दरोडेखोर पळाले. पोलिसांना फुटलेला डीव्हीआर मिळाला असून त्यामधील फुटेजचा शोध घेतला जाणार आहे. दरोडा टाकून सर्व दागिने लुटले जात असतानाच एक ग्राहक आतमध्ये येत होता. दरोडेखोरांना पाहून तो पळून जात असताना त्याच्यावर गोळीबार केला. तेव्हा शोरुमची दर्शनी काच फुटली. सुदैवाने त्या ग्राहकाला गोळी लागली नाही. परंतु, काच लागून तो जखमी झाला.
इतर महत्वाच्या बातम्या