उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. येथील बांधकाम व्यावसायिकाच्या घरात जेवण बनविणाऱ्या एका मोलकरणीने अतिशय किळसवाणा प्रकार केला होता. जेवण बनविताना चपात्याच्या पिठात ही मोलकरणी लघवी मिसळत होती. व्यावसायिकाच्या कुटुंबातील सदस्य अनेक दिवसांपासून यकृताच्या आजाराने ग्रस्त झाले होते. त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी स्वयंपाक घरात एक छुपा कॅमेरा बसविला. त्यानंतर हा किळसवाणा प्रकार समोर आला. पोलिसांनी रिना नावाच्या आरोपी महिलेला अटक केली आहे. सदर महिला आठ वर्षांपासून या घरात काम करत होती. अटक झाल्यानंतर पोलिसांच्या चौकशीदरम्यान मोलकरणीने या कृत्यामागचे कारण सांगितले.
बांधकाम व्यावसायिक नितीन गौतम यांच्या पत्नी रुपम गौतम यांनी स्वयंपाक घरात कॅमेरा लावला होता. यकृताच्या आजाराने काही सदस्य त्रस्त असल्यामुळे त्यांना जेवण बनविणाऱ्या मोलकरणीवर संशय येत होता. जेव्हा या छुप्या कॅमेऱ्यातील फुटेज तपासले तेव्हा गौतम कुटुंबाला धक्काच बसला. आरोपी रिना ही पिठ मळताना त्यात लघुशंका मिसळत होती.
या व्हिडीओच्या आधारावर गौतम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर रिनाला अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त लीपी नगैच यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, आम्ही रिनाची कसून चौकशी केली. प्रथम रिनाने आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा आम्ही तिला व्हिडीओ दाखविला, त्यानंतर मात्र तिने आरोप मान्य केले. यानंतर तिने या कृत्यामागचे कारण सांगितले. घरमालक छोट्या छोट्या गोष्टींवरून बोल लावत होते. याचा रिनाला राग यायचा. याच गोष्टीचा सूड घेण्यासाठी तिने जेवणात लघवी मिसळण्याचा किळसवाणा प्रकार केला.