मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजातील आंदोलक आता जीवाची बाजी लावायला तयार आहेत. जीव गेला तर चालेल मात्र आरक्षण आता हवंच असाच काहीसा पवित्रा मराठा समाजाने घेतलेला दिसत आहे. भोर तालुक्यातील एक तरूण पायाने गाडी चावलत मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. व्हिडीओ समोर आला असून व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.
मराठा आरक्षणाचा मोर्चा आता पुण्यात दाखल झाला आहे. मनोज जरांगेंसोबत मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईच्या दिशेने येण्यासाठी निघाले आहेत. मनोज जरांगे येत्या 26 जानेवारीला मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. जरांगे यांनी विराट संख्येने मराठा समाजाला मुंबईमध्ये दाखल होण्याचं आवाहन केलं आहे. आरक्षण घेऊनच आता माघारी परतणार असल्याचं जरागेंनी म्हटलं आहे. मराठा समाज प्रचंड ताकदीने त्यांच्या पाठिशी उभा आहे. अशातच पुण्यातील भोर तालुक्यामधील संतोष राजशिर्के या तरूणाने अनोख प्रण केला आहे.
भोर तालुक्यातील गवडी या गावामधील संतोष राजेशिर्के हा तरूण पायाने गाडी चालवत भोर ते मुंबई असा जीवघेणा प्रवास करणार आहे. ड्राइवर शेजारच्या पॅसेंजर सीटवर बसून पायाने चारचाकी गाडीचं गाडीचं स्टेरिंग नियंत्रित करणार आहे. भोर ते मुंबई जवळपास 300 किमी अंतर असून हा प्रण त्यांच्या अंगलट येवू शकतो. मात्र पंचकृशीमध्ये संतोष राजेशिर्केच्या या स्टंटची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
मराठा समाज आरक्षणासाठी काहीही करू शकतो हे दाखवून देण्यासाठी हा स्टंट करत असल्याची प्रतिक्रिया राजेशीर्के यांनी दिली आहे. मराठा समाज आरक्षणसाठी आता आक्रमक झालेला पाहायला दिसत आहे. मात्र असा जीवघेणा स्टंट करणं कितपत योग्य आहे असा सवालही काहींनी केला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भोर मधून निघालेल्या मराठा समाजाच्या ताफ्यासोबत राजेशिर्के स्विफ्ट गाडी घेऊन रवाना झाला आहे. सरकारने आरक्षण बाबत गांभीर्याने विचार करावा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी हा भोरमधील स्टंटमॅन भोर ते मुंबई प्रवास हा गाडी पायाने गाडी चालवत निघालेलाय. याआधीही त्यांनी मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी चारचाकी रिव्हर्समध्ये चालवत पुण्याहून मुंबई गाठली होती.