ललित पाटील ड्रग्स प्रकरणात सर्व बाजूने पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. एकीकडे पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. त्याचवेळी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. ललित पाटील याचा गेम होणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ललित पाटील ड्रग्स प्रकरणात पुणे, मुंबई आणि नाशिक पोलिसांकडून कारवाई होत आहे. त्याचवेळी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ललित पाटील याच्या जीवाला धोका असून त्याचे एन्काऊंटर केला जाऊ शकतो किंवा त्याचा आकस्मिक मृत्यू होऊन तपास थांबवला जाऊ शकतो, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले. यापूर्वी आमदार रवींद्र धंगेकरांनी यांनी ललित पाटील याचे एन्काऊंटर होणार असल्याची भूमिका मांडली होती. त्याच्याशी आपण सहमत असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले. गृहमंत्र्यांनी याबाबत लक्ष देण्याची गरज आहे. यासंदर्भात मला काही फोन आले आहेत. एसपी चरणजीत सिंग यांच्यासाठी फोन आला होता, त्यावर मी यशावकाश बोलणार असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.
संजीव ठाकूर याच्यावर मोठे आरोप
ससून रुग्णालयाचे आधिष्ठता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर सुषमा अंधारे यांनी आरोप केले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नार्कोटिक्स चाचणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. संजीव ठाकूर खोटं बोलत आहेत. संजीव ठाकूर यांच्याबाबत सरकार काहीच भूमिका घेत नाही. हर्नियाच्या ऑपरेशनला 5 महिने कसे लागतात? संजीव ठाकूर यांच्यावर फार मोठा राजकीय वरदहस्त आहे का? त्यांना ललित पाटील याच्याकडून आर्थिक लाभ होता का? असे प्रश्न उपस्थित करुन संजीव ठाकूर यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. या प्रकरणात कारागृह अधीक्षकांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. जेल कारागृह अधीक्षक होते? ते नेमकं काय करत होते? असे सुषमा अंधारे यांनी विचारले.