ठोक बाजारात 40 वर्षांत पहिल्यांदा टोमॅटोचे दर प्रति कॅरेट 2500 रुपयांवर जाणार आहेत. यंदा कधी नव्हे असा भात टोमॅटोला मिळाला आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना कधी नव्हे ते अच्छे दिन आलेय.
पुणे : PUNE HERALD | शेतकरी आपल्या शेतामध्ये कष्ट करतो. रात्रंदिवस राब राब राबतो. घाम गाळून पीक काढतो. मग शेतात आलेला माल बाजारात नेतो. परंतु कधी मालास भाव मिळत नाही. उत्पादन खर्च निघत नाही. त्यामुळे तो माल फेकून द्यावा लागतो. टोमॅटो अन् कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच या संकटांना सामोरे जावे लागते. परंतु यंदा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहे. कधी नव्हे असा भाव टोमॅटोला मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकरी टोमॅटो लागवडीमुळे करोडपती झाला आहे.
कोण आहे हा शेतकरी
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पाचघर येथील शेतकरी तुकाराम गायकर. त्यांच्याकडे १८ एकर जमीन आहे. यंदा त्यांना शेतीत लॉटरीच लागली आहे. गायकर यांनी आपल्या १८ एकर जमिनीपैकी १२ एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. अनेक वेळा टोमॅटोला भाव मिळत नाही, हे माहीत असून त्यांनी हा निर्णय घेतला. यंदा चांगले उत्पादन अन् बाजारभाव मिळाला.
सुन अन् मुलगा सांभळतो जबाबदारी
तुकाराम गायकर यांची सून सोनाली गायकर शेतात काम करते. लागवडीपासून पॅकींगपर्यंतचे सर्व व्यवस्थापन सोनाली सांभाळतात. त्यांचा मुलगा ईश्वर गायकर हा विक्रीचे व्यवस्थापन करतो. यंदा त्यांनी आतापर्यंत १३ हजार कॅरेट टोमॅटोची विक्री केली आहे. त्या माध्यमातून त्यांना एक कोटी २५ लाखांपेक्षा जास्त कमाई झाली आहे. त्यांच्या शेतात शंभर महिलांना रोजगारही मिळाला आहे.
दोन दिवसांपूर्वी एका दिवसांत १८ लाख
शुक्रवारी १४ जुलै रोजी गायकर यांना टोमॅटो बाजारात आणले. त्यावेळी त्यांना २१०० रुपये दर मिळाला. त्यांनी ९०० कॅरेट टोमॅटो विकले अन् एका दिवसांत १८ लाख रुपये मिळवले. मागील महिन्याभरात ग्रेडनुसार त्यांच्या टोमॅटोला दर १००० ते २४०० रुपयांपर्यंत मिळाला. जुन्नर तालुक्यात एकटे गायकर नाही तर अन्य दहा, बारा शेतकरी आहेत जे टोमॅटो विक्रीतून करोडपती झाले आहे. जुन्नर बाजार समितीत एका महिन्यात ८० कोटींचा व्यवहार झाला आहे.
अभिनेता सुनील शेट्टीवर चौफेर टीका
अभिनेता सुनील शेट्टीने याने भाव वाढल्यामुळे त्याचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे, असं म्हटले होते. त्याच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर त्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे. शेतकरी नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. जर भाव वाढले असतील तर सुनील शेट्टीने टोमॅटो खाऊ नये, परंतु शेतकऱ्यांची टिंगल करू नये, या शब्दांत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी त्यांना सुनावले आहे.