बस मार्केटयार्ड जवळ घेऊन गेला, ५ हजार रुपयांची बॅटरी चोरली आणि बसच्या काचा फोडून नुकसान.
पुणे : PUNE HERALD | पालखीची गर्दी असल्याने आगारापर्यंत जाण्यास जागा नसल्याने सारसबागेजवळ चालकाने पीएमपी बस पार्क केली होती. गाडीला चावी तशीच राहिल्याचे पाहून चोरट्याने चक्क पीएमपी चोरून नेली. मार्केटयार्ड बस डेपोजवळ ही बस सोडून दिली. जाताना तिची बॅटरी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच बसच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले.
याप्रकरणी पीएमपीच्या स्वारगेट आगाराचे सुरक्षा अधिकारी सुरेश सोनवणे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीएमपीच्या स्वारगेट आगारातून धावणाऱ्या बस रात्री स्वारगेट परिसरात तसेच पूलगेट स्थानकात लावतात. मंगळवारी रात्री पालखी सोहळ्यामुळे पूलगेटला बस लावण्यास जागा नसल्याने चालकाने सारसबागजवळील सणस ग्राऊंड येथील फुटपाथच्या कडेला पार्क केली होती. चोरट्याने ही बस चालू करून मार्केटयार्ड बस डेपोजवळ नेली. तेथे बसमधील ५ हजार रुपयांची बॅटरी काढून चोरली. बसच्या काचा फोडून नुकसान केले.