ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने अपघात..
आळंदी (पुणे) : PUNE HERALD | तीन वर्षांच्या मुलाला दुचाकीवरून घेऊन जात असताना ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात बापाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर, तीन वर्षांचा चिमुकला मुलगा जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. १२) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वडमुखवाडी येथील खडी मशीन रोडवर घडली.
शिवशंकर वैजनाथ सूर्यवंशी (वय ४६) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मुलगा सक्षम शिवशंकर सूर्यवंशी (वय ३) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार रमेश मते यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक (एचआर ३८/वाय ८७८३) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर हे त्यांचा मुलगा सक्षम याला घेऊन दुचाकीवरून वडमुखवाडी येथील खडी मशीन रोडने जात होते. त्यावेळी ट्रकने शिवशंकर यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात शिवशंकर आणि सक्षम हे दोघेही जखमी झाले. अपघात झाल्यानंतर जखमींना वैद्यकीय मदत न करता ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला.