Tier-2 Cities : भारतात नोकरीसाठी (Job Opportunities) तरुणांची मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरु या शहरांना विशेष पसंती असते. म्हणूनच या शहरांचा समावेश भारतातील टियर-1 (Tier -1) मध्ये होतो. टियर-1 म्हणजे या शहरांमध्ये राहणीमान खूप महाग असते. त्यानंतर टियर-2 (Tier-2) आणि टियर-3 (Tier -3) मध्ये शहारांचे वर्गीकरण केले जाते. टियर दोनमध्ये प्रामुख्याने चंदीगड, ठाणे, कोची, जयपूर, लखनौ, भोपाळ यांसारख्या शहरांचा समावेश आहे. तर टियर तीनमध्ये विजवाडा, मथुरा, नाशिक, झाशी यांसारख्या शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे.
पण जेव्हा नोकरीचा प्रश्न येतो तेव्हा मात्र तरुण टियर वन म्हणजेच मुंबई, दिल्ली, बंगळूर, पुणे यांसारख्या शहरांची निवड करतात. पण नुकत्याच समोर आलेल्या रँडस्टॅड या संस्थेच्या अहवालानुसार, टियर वनपेक्षा टियर दोनमधील शहरांमध्ये म्हणजेच जयपूर, वडोदरा, ठाणे, चंदीगड यांसारख्या शहरांमध्ये नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध असल्याचं चित्र सध्या आहे. त्यामुळे तरुण या शहरांना जास्त पसंती देताना पाहायला मिळत आहे. वाढत्या औद्योगिक क्षेत्रांसाठी गरजेचा असलेला जवळपास 54 टक्के रोजगार या शहरांमधून उपलब्ध होत आहे. बँकिंग, आयटी, फार्मास्युटिकल्स आणि हेल्थकेअर यासारख्या क्षेत्रांसाठी टियर दोनमधील शहरामध्ये जास्त रोजगार निर्माण असल्याचं चित्र सध्या आहे.
करिअरची सुरुवात करणाऱ्या तरुणांना संधी
करिअरची सरुवात करणाऱ्या तरुणांसाठी यामुळे अधिक प्रमाणात संधी उपलब्ध होत असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच यामुळे तरुणांना लवकर त्यांच्या भविष्याची बांधणी करण्यास मदत होत आहे. या शहरांमध्ये फ्रेशर्सना नोकरीसाठी संधी उपलब्ध होत आहेत. तसेच बँकिग क्षेत्राने देखील त्यांचा व्यवसाय वाढण्यासाठी या शहरांची निवड केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या शहरातील तरुणांना आता बाहेर जाऊन नोकरी शोधण्याची फारशी गरज भासणार नाही असं देखील म्हटलं जात आहे.
उत्पादन क्षेत्रासाठी टियर दोनमधील नोकरीच्या संधी
उत्पादन क्षेत्रासाठी टियर दोनमधील शहरांमध्ये फ्रेशर्सना नोकरीच्या बऱ्याच संधी उपलब्ध असल्याचं म्हटलं जात आहे. उत्पादनाच्या क्षेत्राची टियर दोनच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रँडस्टॅडने दिलेल्या अहवालानुसार, जवळपास 78.81 टक्के उत्पादन क्षेत्राच्या संधी या फ्रेशर्ससाठी टियर दोनच्या शहरांमध्ये उपलब्ध आहेत. तर यामधील 17.8 टक्के संधी या थोडाफार अनुभव असणाऱ्यांसाठी आणि 3.39 टक्के संधी या अनुभवी लोकांसाठी उपलब्ध आहेत. कोयंबतूर या शहराने या क्षेत्रात बाजी मारली. फ्रेशर्सना कोयंबतूरमध्ये उत्पादन क्षेत्रासाठी सर्वाधिक संधी उपलब्ध आहेत.
आयटी क्षेत्रातील नोकरीच्या संधी
बंगळूरला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हटलं जातं. बंगळुरुमध्ये आयटी क्षेत्रातील सर्वाधिक संधी उपलब्ध असतात. पण सध्या टियर दोनच्या अनेक शहरांमध्ये आयटी क्षेत्रातील अनेक संधी उपलब्ध झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रँडस्टॅडने दिलेल्या अहवालानुसार, फ्रेशर्ससाठी आयटी क्षेत्रामध्ये 88.63 टक्के नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तिरुवनंतपुरम शहरात सर्वाधिक संधी उपलब्ध असल्याचं यावेळी आढळून आलं. तर केरळमधील आयटी क्षेत्रामध्ये जवळपास 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे.
फार्मास्युटिकल्स आणि हेल्थकेअर क्षेत्रातील संधी
ठाणे शहर या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे. ठाण्यामध्ये फ्रेशर्ससाठी 11.05 टक्के नोकरीच्या संधी या शहरांसाठी उपलब्ध आहेत. एक प्रमुख फार्मा आणि हेल्थकेअर हब म्हणून ठाण्याचा दर्जा आता वाढलेला पाहायला मिळत आहे. या क्षेत्राच्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध सरकारी उपक्रम आणि विविध व्यावसायिकांच्या गुंतवणुकीचा फार मोठा वाटा असल्याचं म्हटलं जात आहे. तर या यादीमध्ये वडोदरा शहर दुसऱ्या स्थानावर आहे. वडोदरामध्ये फ्रेशर्ससाठी 8.77 टक्के नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
वाढत्या शहरीकरणामुळे सध्या नोकरी मिळण्याची स्पर्धा दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी तरुणांना बराच संघर्ष देखील करावा लागत आहे. पण आता अनेक शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधींमुळे तरुणांसाठी नोकरीचे अनेक मार्ग मोकळे होण्यास मदत होणार असल्याचं म्हटलं जात आहे.