नोकरी लावून देतो, असे सांगत तब्बल ४४ जणांची फसवणूक करणाऱ्या राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्तांना अटक झालीय. या प्रकरणात त्यांचा भावास यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
एक, दोन नाही तर तब्बल ४४ जणांना नोकरीचे आमिष दिले. त्यांची ५ कोटींमध्ये फसवणूक केली. हा प्रकार कोणी दलाल किंवा दुसऱ्या व्यक्तीने केली नाही. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे आणि त्यांचा भावाने केला. या प्रकरणात हडपसर पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्यात शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली. शैलजा दराडे यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे याला यापूर्वी अटक झाली आहे. दरम्यान, शैलजा दराडे यांना न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
काय आहे प्रकार
शैलजा दराडे आणि दादासाहेब दराडे यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक तरुणांची फसवणूक केली. या प्रकरणी ४४ जण पुढे आले आहेत. सांगली जिल्ह्यातील शिक्षक पोपट सुखदेव सूर्यवंशी यांनी फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्या नात्यातील महिलेस शिक्षक करण्यासाठी जून २०१९ मध्ये त्यांनी दादासाहेब दराडे याच्याशी चर्चा केली. दादासाहेब दराडे यांनी माझी बहीण शैलजा दराडे शिक्षण विभागात अधिकारी आहे. मी तुमच्या नातेवाईकांना नोकरी देतो, असे सांगत त्यांच्याकडून हडपसरमध्ये २७ लाख रुपये घेतले होते.
फसवणूक झाल्याचे उघड झाले
दादासाहेब दराडे यांना पैसे देऊन अनेक महिने झाले. पण नोकरी मिळाली नाही. सूर्यवंशी यांनी पैसे परत मागितले. परंतु दादासाहेब रामचंद्र दराडे यांनी पैसे दिले नाही. यामुळे त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. दादासाहेब दराडे यांना यापूर्वीच अटक झाली तर आता शैलजा दराडे यांना ७ ऑगस्ट रोजी अटक झाली. नोकरीच्या आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या प्रकरणात मोठ्या अधिकाऱ्यास अटक झाल्याचा हा पहिलाच प्रकार असेल.