संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना आमदार सुरेश धस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते पुण्यात बोलत होते.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेनं राज्यात चांगलीच खळबळ उडाली, संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरुवातीपासूनच आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आज पुण्यात संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आक्रोश मार्चा काढण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
नेमकं काय म्हणाले सुरेश धस?
14 जून रोजी वाल्मिक कराड, बिक्कड आणि शुक्ला यांची धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली. जोशी नावाचे जे मुंडे यांचे पी ए आहेत त्यांच्या मार्फत कंपनीशी संंधान साधण्याचा प्रयत्न झाला. वाल्मिक कराड यांनी बिक्कड यांना सांगून दुसऱ्या कंपनीचं काम बंद पाडलं. 19 जून रोजी सातपुडा या बंगल्यावर बैठक झाली, 3 कोटी रुपयांची मागणी झाली नंतर कंपनी दोन कोटी रुपयांना राजी झाली. ओम साई राम या कंपनीच्या नावावर सिक्युरिटी देण्यात आली. नितीन बिक्कड याला उचललं तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, संतोष देशमुख यांचा मर्डर केला गेला, नितीन कुलकर्णी हा वाल्मीकचा पीए आहे तो 17 मोबाईल वापरतो, त्यातून सगळे सिक्रेट बाहेर येतील. मी याबाबत ईडी अधिकाऱ्यांना, देशाचे गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार आहे. पोलिसांना सुद्धा सह आरोपी करा, जे वाल्मीकचे बॉडीगार्ड आहेत, त्यांना सुद्धा आरोपी करा, अशी मागणी यावेळी सुरेश धस यांनी केली आहे.
दरम्यान दुसरीकडे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील यावेली बोलताना जोरदार हल्लाबोल केला आहे. नऊ तारखेला अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा, जातीचा नाही. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत मोर्चा सुरूच राहणार असा इशारा बजरंग सोनवणे यांनी दिला आहे.